मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 जानेवारी) दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागल्याचं स्पष्ट झालं. मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूटचा हा नवीन प्लांट आहे. "मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरु होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत," असं राजेश टोपे म्हणाले.


राजेश टोपेंनी सांगितलं की, "कोरोना लस निर्मिती जिथे होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे लसीचं कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे."


आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार.
प्रतिक पाष्टे - डेक्कन, पुणे
महेंद्र इंगळे - नऱ्हे, पुणे
रमा शंकर हरिजन - यूपी
बिपीन सरोज - यूपी
सुशील कुमार पांडे - बिहार


Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात अदर पुनावालांचं ट्वीट, म्हणाले...


काय म्हणाले होते अदर पुनावाला? 


दरम्यान आगीनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार. या आगीत जीवितहानी झालेली नाही, तसंच सुदैवाने कुणीही गंभीर जखमीही झालेलं नाही. या घटनेत काही मजल्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे."





मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. ठराज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


Serum Institute fire: सीरम इन्स्टिट्यूटला आग.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ दखल, अजित पवार पुण्याकडे रवाना


कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझवण्याच्या आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करु इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे."


Serum Institute Fire : केंद्रीय तपास यंत्रणेनं आगीचा अहवाल मागवला


आगीचा कोणताही परिणाम कोव्हिशिल्डवर नाही


कोविशील्ड' लसीचे उत्पादन सुरु असलेली इमारत सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत असून आगीवर नियंत्रण मिळवलं. ज्या ठिकाणी आग लागली तिथं कोरोना लस बनत नाही तर बीसीजी लस बनते.