सिंधुदुर्ग : सव्वा तासाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोणत्याही प्रश्नावर लक्ष टाकले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. महसूली उत्पन्न 21 टक्क्यांवर आलं. त्यामुळे महसुली तूट 35% आहे. त्यासोबतच राज्यावरचं कर्ज पाच लक्ष दोन हजारांवर गेलं आहे. या सर्व आर्थिक परिस्थितीमुळे राज्य डबघाईला येऊन यासंबंधी एकही शब्द न बोलणं आणि मुलाखतीमध्ये विरोधकांना धमक्या देणे, ईडी, सीबीआय यांनाही धमक्या देणे हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती आणि मुखमत्र्यांच्या आजच्या सामनातील मुलाखती संदर्भात नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते.


आतापर्यंत आम्ही हात धुवत होतो, आता हात धुऊन मागे लागेल हे वाक्य मुख्यमंत्र्याच्या तोंडी योग्य नाही. हात धुऊन कोणाच्या मागे लागणार ईडीच्या, सीबीआयच्या की आमच्या भाजप नेत्यांच्या. 56 आमदारांचं सरकार किती दिवस चालेल, स्वतःचं कौतुक स्वतः करून घेत आहेत. हे म्हणजे स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्यासारखं प्रबोधन आहे. राज्याच्या विकास, प्रगतीसाठी, राज्याच्या बेकारी संबंधित, राज्यातील उद्योगधंदे आणि शेती या सर्वांचा बट्ट्याबोळ चालला असताना शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन, वीज बिलासंदर्भात दिलेली आश्वासनं यातील एकही आश्वाशनाची पूर्तता केली नाही.


सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कुठेही केलेली नाही : राणे
सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कुठेही केलेली नाही. फक्त धमक्या देत आहेत, या धमक्याचे परिणाम कोणावर होणार याचा विचार त्यांनी करावा. संजय राऊत प्रश्न विचारतो आणि मुख्यमंत्री उत्तर देतात हे उत्तर देताना आपले अधिकार कक्ष कुठपर्यंत पोचला. माननीय मोदी यांच्यावर टीका करण्याची पात्रता आणि गुणवत्ता यांच्यामध्ये आहे का? गेल्या वर्षभरात सामाजिक-आर्थिक आणि विधायक कुठलं काम, विकासात्मक कुठली कामं केली का? ही मुख्यमंत्र्यांनी सांगावीत. एका वर्षानंतर कार्य आणि कर्तृत्व काय केलं ते त्यांनी सांगावं.


Majha Maharashtra Majha Vision | सत्ता गेल्याने विरोधकांचं व्हिजन धूसर झालंय, आमचं व्हिजन साफ : आदित्य ठाकरे


बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता. भाजपला साहेबांनी सोडलं नसतं. हिंदूत्ववादी पक्षाला सोडून दुसरीकडे जा असं साहेब केव्हा म्हणाले नसते. साहेब सत्तेच्यापाठी केव्हाही गेले नसते. साहेबांनी हिंदुत्व जोपासलं, मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहिले, सैनिकांना मुख्यमंत्री बनवतो बोलला आणि स्वतः सूट घालून जाऊन उभा राहिला शपथविधीला, हा कसला फुसका मुख्यमंत्री. डरकाळ्या फोडणारा मुख्यमंत्री नाहीतर फुसका मुख्यमंत्री आहे.


तिन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. त्यांची विचारसरणी जुळत नाही, त्यांना सत्ता ही पैसे कमवण्यासाठी पाहिजे. जनहितासाठी आणि लोकहितासाठी हे सरकार नाही. स्वतःसाठी हे सरकार या लोकांनी बनवलं आहे. मंत्रिपद मिळाल्याने आपले दुकान चालू ठेवण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिघांना एकत्र येऊन हे दुकान घातलं आहे.