मुंबई: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील आपल्या पक्षाची बैठक आज घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी करण्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहे, त्याचबरोबर प्रभारी देखील नेमल्याची माहिती समोर आली आहे.


आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करतील त्याचबरोबर एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करतील असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बेठकीवेळी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्य नोंदणीवर भर द्या. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील 8 आमदार ठाकरेंच्या सोबत आहेत. तर 6 आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत.


ठाकरे गटानेही सुरू केली जोरदार तयारी


लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याची माहिती आहे. वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना  विधानसभा निवडणुकीसाठी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.  


शिवसेना ठाकरे गट मुंबईत या संभाव्य जागा लढवण्याची शक्यता 


शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा
वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली, मलबार हील, अनुशक्ती नगर मानखुर्द शिवाजीनगर निवडणुकीसाठी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.