Who Was Aanvi Kamdar Social Media Influencer :  काळानुसार बदलत असलेल्या सोशल मीडियाच्या नवनवीन रुपाने तरुणाईला भुरळ पाडली आहे. कधीकाळी फोटो आणि आपल्या मनातील दोन शब्द सांगण्यापुरता असलेला सोशल मीडिया आता व्हिडीओ, रील्सकडे झपाट्याने वाटचाल केली. अनेकांना व्हिडीओ, रील्सचे वेड लागले. पण, याच वेडापोटी आता सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आपला जीव ही धोक्यात घालू लागले आहेत. अन्वी कामदार (Aanvi Kamdar) या सोशल मीडिया इनफ्लूएन्सर तरुणीचा दरीत कोसळल्याने निधन झाले. 


त्या दिवशी नेमकं काय झालं?


अन्वी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मंगळवारी 16 जुलै रोजी सोशल मीडियावर  प्रसिद्ध झालेल्या असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला. रील शूट करत असताना अन्वीचा अचानक तोल गेला आणि ती 250 ते 300 फूट खोल दरीत कोसळली. तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगांव पोलीस स्थानकात दिली, माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले. कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतचे कर्माचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले, व महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा घेत आढावा घेत होते. विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने तेथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते.


बचाव पथकाच्या हालचाली... 


घटनास्थळी पोहोचताच अन्वी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्यानंतर शंतनु कुवेसकर आणि सागर दहींबेकर त्यांचे सहकारी सुरज दहींबेकर आणि शुभंकर वनारसे फक्त सुरक्षा रोपच्या साहाय्याने साधारण 15 मिनिटातच दरीत पडलेल्या अन्वीपर्यंत पोहोचले. त्यावेळी घटनेची तीव्रता लक्षात घेता कदाचित तिचे प्राण गेले असावे असे त्यांना वाटले होते. पण, तिचा श्वास सुरू होता. चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचरवर सुरक्षित बांधले. खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून 300 फूट वरती घेऊन जाणे अधिक आव्हानात्मक होते. अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून दोन सहकारी प्रयाग बामुगडे,  शंतनु कुवेसकर, सागर दहींबेकर, सुरज दहींबेकर आणि शुभंकर वनारसे  मदतीस खाली पोहोचले आणि सर्वांनी अन्वीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण 100 फूट अंतर स्ट्रेचरवर उचलून आणले. त्यानंतर महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे वरून रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले, त्यामुळे बचावकार्याला अधिक गती मिळाली. 


प्रयत्नांची शर्थ पण...


श्वास सुरू असलेल्या जखमी अन्वीला दरीतूनवर काढण्यास बचाव पथकाला यश मिळाले. त्यामुळे जखमी असलेल्या अन्वीचे प्राण वाचवण्याची एक आशा निर्माण झाली होती. त्याच आशेने जखमी अन्वीला तातडीने  माणगांव उपजिल्ह्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली. 


अन्वी कामदार कोण होती?


अन्वी कामदार ही एक सोशल मीडिया इनफ्लुएन्सर होती. अन्वी लाईफस्टाईल आणि टूरिझमसंदर्भातील व्लॉग करत होती. तिने देशभरातील अनेक पर्यटन स्थळांची भटकंती केली होती. तिच्या व्हिडीओ, रील्सवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर फिरून तिथले रील्स बनवणे, त्याचप्रमाणे हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे रिव्यूही ती करायची. इन्स्टाग्राम अकाउंटवर अन्वीचे अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. अन्वी ही प्रामुख्याने मान्सूनमधील महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळाची माहिती देत असे. आपल्या फॉलोअर्सना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणची माहिती देत असे. 




सोशल मीडियावर आपली छाप सोडणारी अन्वी ही व्यवसायाने सीए असल्याची माहिती आहे. अन्वी ही बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या डेलॉइट कंपनीत नोकरी करत होती. मुळची मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या अन्वीने सोशल मीडियावर पॅशनने रील्स तयार केले. या पॅशनने, वेडाने तिला रीलस्टार केले. पण, त्याच वेडापायी तिने आपले प्राण गमावले असल्याची दुर्देवी घटना घडली आहे.