CM Eknath Shinde : सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरू आहे. अशावेळी प्रत्येक नेता आपापली गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, या काळात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपला मदतीचा हात कायम पुढे करण्यात जराही कसूर ठेवत नाहीत, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपघातग्रस्त दुसाकीस्वाराच्या मदतीला मध्यरात्री धावून गेल्याचे पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांच्या मदतीने तरुणाच्या हातावर उपचार करण्यात आले.  


 गाड्यांचा ताफा थांबवून केली तरुणाची विचारपूस 


परवा रात्री वर्षा बंगल्यावरील नियोजित बैठका आटोपून मुख्यमंत्री रात्री उशिरा ठाण्याकडे निघाले होते. यावेळी बिकेसी येथील ब्रिजवर त्यांना एक बाईकस्वार जखमी अवस्थेत आढळून आला. यावेळी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या तरुणाची विचारपूस केली. रस्त्यावर अचानक अपघात झाल्यानं त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे त्यांना कळले. त्यानंतर तत्काळ त्यांनी आपल्या ताफ्यातील अ्रम्ब्युलन्स मधील डॉक्टरांना बोलावून या तरुणांच्या हातावर उपचार करायला सांगितले. तसेच त्याची विचारपूस करुन तो ठीक असल्याची खात्री पटल्यानंतरच ते ठाण्याला निघाले.


असे पहिल्यांदाच नव्हे तर अनेकदा घडले आहे. जेव्हा आपला बडेजावपणा बाजूला ठेवून रस्त्यावरील अपघातग्रस्ताच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले आहेत. सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच मॅरेथॉन बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरु आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या मनातील माणूस कायम जागा असतो हेच त्यांच्या या कृतीमधून पुन्हा एकदा दिसून आले.