Satara News : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आज कराडमध्ये पोहोचले. महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त प्रीति संगमवारील समाधीस्थळी जाऊन एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनासह अन्य विविध विकास कामांचे उदघाटन, भुमिपुजन होणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.


मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. कराडमधील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला अजित पवार यांना डावलल्यामुळे आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराडमध्ये दोन प्रशासकीय इमारतींचं उद्घाटन होणार आहे. 


बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त करताना म्हणाले, आज मुंबईत यशवंतराव प्रतिष्ठानकडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने शरद पवार या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आम्ही येऊन या ठिकाणी अभिवादन केले. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकारसह त्यापूर्वी सरकारचाही निधी देण्यात सहभाग आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते. त्यावेळी निधी दिला गेला होता आणि त्या माध्यमातून ही कामे झाली आहेत. तहसीलच्या इमारतीचे कामकाज दोन वर्षांपासून सुरु आहे आज त्याचे लोकार्पण होत आहे. शासकीय विश्रामगृहाचेही काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, ते ही काम पूर्ण झाल्याने त्या इमारतीचेही आज लोकार्पण होत आहे. त्यांनी निधी दिला होता. आम्हाला आलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या कानी घालायला हवे होते. कराडच्या विकासात त्यांचे योगदान असल्याने त्यांचे नाव आवश्यक होते. 


यशवंतराव चव्हाण यांची आज 38 वी पुण्यतिथी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन


दरम्यान, कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील प्रितीसंगमावर जावून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे आमदार  महेश शिंदे उपस्थित होते. 


समाधीस्थळी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. सकाळपासून नागरिकांनी प्रितीसंगमावरील समाधीस्थळी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. तसेच विविध राजकीय नेत्यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी जावून अभिवादन केले. यामध्ये साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नरेंद्र पाटील या नेत्यांनी  प्रितीसंगमावर जावून अभिवादन केलं.


इतर महत्वाच्या बातम्या