Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांनी ज्या वाघनख्यांनी (Waghnakhe) स्वराज्यावर आलेल्या अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा काढला आणि आदिलशाहीला हादरा दिला ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणण्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 16 नोव्हेंबर रोजी ती वाघनखं मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) दिली. 


छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 


यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं की, देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांना ही वाघनखं पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघनखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उभारण्यात येईल.  


सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावरही शेअर केली आहे. 






लंडनमधील ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखं आणण्यात येणार आहेत त्या संग्रहालयाने करार करताना काही अटी समोर ठेवल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे, 


- ही वाघनखं कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत.
- या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात यावं. जेणेकरून त्याची चोरी होऊ नये.
- या वाघनखांच्या सुरक्षेसंबंधित काय उपाययोजना करण्यात येणार आहे त्या सांगाव्यात. त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी.


जगदंबा तलवार 2024 पर्यंत भारतात आणणार


शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार (Jagdamba Sword) ही सध्या ब्रिटनमध्ये असून ती परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे. 


ही बातमी वाचा: