Shivjayanti 2023: राज्यात आज (10 मार्च) तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जात आहे. राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील शिवरायांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अभिवादन केलं आहे.
आज तिथीनुसार शिवजयंती
आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मागच्या महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरुन दोन गटाचे दोन भिन्न मत असल्यामुळे शिवजयंती दोन वेळा साजरी केली जाते. सरकारनं शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. परंतु, फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल, असे जाहीर केलं. यंदा शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज म्हणजेच, 10 मार्च रोजी आहे.
शिवकालीन नाण्यावर शिवरायाचं चित्र
राज्यात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गवाणे गावचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शिवकालीन नाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारलं आहे. शिवरायांचं चित्र साकारण्यासाठी त्यांनी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे. हे सूक्ष्म चित्र साकारायला त्यांनी भिंगाचा वापर केला आहे.
कळवणला शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन होणार
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असलेल्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आज पार पडणार आहे. कळवण येथील शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे. पद्मभूषण राम सुतार मराठमोळे शिल्पकार यांनी कळवणच्या अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पुतळ्याला आकार दिला आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची 21 फूट असून लांबी 17 फूट आहे. ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे वजन 7 टन असून चबुतऱ्याची उंची 18 फूट तर लांबी 25 आणि रुंदी 15 फूट आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 'शिवजयंती उत्सव' साजरा
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीचा उत्सव आज ठाण्यात देखील उत्साह पूर्ण वातावरण साजरा करण्यात आला. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते. त्यानंतर शिवप्रेमींकडून मासुंदा तलाव ते चिंतामणी चौक तसेच टेम्बी नाका अशी शिवाजी महाराजांची पालखी देखील काढण्यात आली.
संगमनेर कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा
संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याला कालीचरण महाराजांनी हजेरी लावली आहे. कालीचरण महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली. यानंतर संगमनेर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रथामध्ये कालीचरण महाराज विराजमान झाले होते तर त्या पाठोपाठ शेकडो दुचाकी या मोटरसायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना कालीचरण महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन केलं आहे.
शिवजयंतीला नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने पथसंचालन
नंदुरबार जिल्ह्यात तिथीनुसार, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे, असं जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह शहरी भागात शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढल्या जात असतात. सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रांसाठी पोलीस दलाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या सर्वच संवेदनशील भागांत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज सकाळी पथसंचालन करण्यात आलं. नंदुरबार जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलं आहेत. पोलीस दलाच्या वतीनं संवेदनशील भागांवर तसेच संवेदनशील भागांतून जाणाऱ्या शोभायात्रांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करत असताना शिवभक्तांनी नियमांचं पालन करावं, असं आहवान जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केलं आहे.