Chhatrapati Sambhajinagar: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणाऱ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना भाजपने विनवण्या करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते दानवे, भाजप मंत्री अतुल सावे यांची पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. पदाधिकारी मात्र भाजप सोडण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत असून भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 7 ते 8 माजी नगरसेवक व पदाधिकारी येत्या सात जुलैला शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी वेगवेगळ्या मतदार संघासाठी योग्य उमेदवारांचा शोध चालू केला असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरात अनेक माजी नगरसेवक व उपमहापौर, पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने खळबळ उडाली आहे.


7 जुलैला होणार पक्षप्रवेश सोहळा


उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकाने गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.


भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय?


भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भवना आहे, याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असं आम्हाला वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केलं होतं. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, असे राजू शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा:


उद्धव ठाकरेंचा संजय शिरसाट, अतुल सावेंना मोठा धक्का; संभाजीनगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवबंधन बांधणार!