Chhagan Bhujbal on Manoj Jarange : छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी ते बोलत होते. मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहित नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव केल्याचा आरोपही त्यांनी केला. 


आपल्याला दोघांच्या पाठिशी उभं राहिचे आहे. दलित आदिवासी समाज तुमच्यासोबत आहे, असा विश्वास हाके आणि आणि वाघमारे यांना भुजबळांनी दिला. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाच्या अश्वासनानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतलं. मागील दहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. "आंदोलन स्थगित कऱण्यात आलेय, मात्र लढा सुरुच असल्याचं लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले. "


लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसले आहेत. मागील दहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजन  हे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. त्याशिवाय सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, याचं आश्वासनही दिले. आपल्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे, त्याशिवाय सकारात्मक चर्चा झाली आहे, असा विश्वासही यावेळी छगन भुजबळ यांनी हाके यांना दिला. 


पंकजा मुंडे यांचा पराभव केला - 


पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव केल्याचा आरोप यावेळी छगन भुजभळ यांनी केला. त्याशिवाय लोकसभा आणि विधानसभामध्ये ओबीसी समालाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही यावेळी छगन भुजबळ यांनी केली. दरम्यान, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत झाली. बीडमध्ये उमदेवारांची घोषणा झाल्यानंतरच ओबीसी आणि मराठा आमनेसामने आले होते. निकालानंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळला होता. विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची भेटही घेतली होती. 


मनोज जरांगेंवर हल्लाबोल - 


सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. मनोज जरांगे काय बोलते, हे त्यांना सुद्धा कळत नाही. मनोज जरांगे यांनी हाके यांच्यासोबत चर्चा करावी, असे भुजभळ म्हणाले. त्याशिवाय त्यांना (मराठा) दुसरं ताट द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पाठिंबा देतो, असेही भुजबळ म्हणाले. 


हाकेंसोबत चर्चा करावी -


औकातीत राहा बेट्या हो… आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं, असं छगन भुजबळ म्हणाले.


तर तुमचं आरक्षण टिकेल 


अन्याय झालेल्या समाज हळूहळू पुढे यावेत, त्यासाठी आरक्षण देण्यात आलेय. अन्याय झालेल्या समाजाने आरक्षणासाठी एकत्र यावं. हातावर हात धरुन बसलात तर काहीही होणार नाही. यापुढे तुम्ही सर्व एकत्र राहिलात, तर तुमचं आरक्षण टिकेल, असे भुजबळ म्हणाले. 


आम्ही कुणाला धमक्या देत नाही, असा टोला भुजबळ यांनी मनोज जरांगेंना लगावला. त्याशिवाय आम्ही कुणाला घाबरतही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 


तो (मनोज जरांगे) बसलाय तिकडे, जातीयवाद करतोय. मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहित नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.  जातनिहाय जनगणननेला फडणवीसांचा पाठिंबा असल्याचेही यावेळी भुजबळांनी सांगितलं. 


त्यांची दादागिरी कधी थांबणार ? 


एकीकडे दहा टक्के आरक्षण दिले, आता इकडेपण आरक्षण मागत आहेत. त्यांची दादागिरी कधी थांबणार आहे. आमच्यावर अन्याय होतेय, कधीपर्यंत सहन करायचं? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.  राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले. ज्यांनी खोटे दाखले वाटले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार.. खोटे दाखले देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, असे भुजबळ म्हणाले.