Chhagan Bhujbal : मंत्रीमंडळ विस्तारात (Cabinet expansion) संधी न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज आहेत. मंत्रीमंडळात समावेश न झाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भुजबळ थेट नागपुरचं हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला (Nashik) रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता. त्यानंतर आज छगन भुजबळ हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता पुढे काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. ते नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद न साधताच भुजबळ मुंबईला रवाना झाले आहेत. भुजबळ उद्या आणि परवा राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना भेटणार आहेत. भुजबळ पुढे काय निर्णय घेतात याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 
एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात छगन भुजबळ यांच्याबाबत जे घडलं ते भुजबळ ओबीसी असल्यामुळे घडत असल्याची टीका विरोधकांनी केलीय. भुजबळांनी देखील मंत्रिपद नाकारल्यामुळे स्वतःच्या पक्षा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळ आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार की वेगळा पर्याय निवडणार हे आगामी 2 ते 3 दिवसांत स्पष्ट होणार आहे. भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


छगन भुजबळांचं सुचक वक्तव्य


मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असे म्हटले. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तेव्हा तुम्हाला येवल्यातून लढलं पाहिजे, असं सांगण्यात आले. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमानं पुढं जाईल, असं सांगितलं गेलं. माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. मला ज्यांनी प्रेम दिलं त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? असे विचारले असता “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” असे सूचक वक्तव्य छगन भुजबळांनी केले.


महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, मनोज जरांगेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले....