Chhagan Bhujbal On Maratha Reservation : पुण्यात (Pune) आज अजित पवार गटाकडून युवक मेळावा आयोजित करण्यात आला असून, यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत आपली भूमिका पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व्यासपीठावर असतानाच भुजबळ यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसेच, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर बोलतांना स्पष्ट भूमिका मांडली. 


यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचे वादळ उठलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आपली पहिल्यापासून आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येतोय. त्याला आपला खंबीर पाठिंबा आहे. लहान-सहान सर्वांना सोबत घेऊन पुढं जावं लागेल. अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याक ही सोबत घेऊन जावं लागेल. कोणावर ही अन्याय होता कामा नये. जीभ घसरली तर अवघड होतं. शांततेत काम करावं लागणार आहे. अजित दादांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचं असल्याचे भुजबळ म्हणाले आहे. 


शरद पवार गटातील नेत्यांना सल्ला....


"आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार करायला हवं. पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं. तुमच्या पुढं काय ठेवलंय ते पहा. मी पण पक्षाच्या जन्मापासून होतो. मात्र, आता महिला, पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजित दादांच्या माध्यमातून उभारलं आहे, ते पहा आणि पुनर्विचार करा," असा सल्ला भुजबळ यांनी शरद पवार गटातील नेत्यांना दिला आहे... 


रोहित पवारांवर टीका... 


दरम्यान याचवेळी बोलतांना छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. "कर्जत जामखेडचे तरुण जाणते नेते आहेत. ते स्वतःला तरुणांचे नेते मानतात. पण त्यांच्या आजूबाजूला पगारी तरुण असतात, इथं बघा स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत," असे भुजबळ म्हणाले. 


बहुमताच्या बाजूने निर्णय लागतो...


कोण म्हणतं पक्ष चोरलं, कोणी आणखी काही म्हणतं. मात्र, लक्षात ठेवा लोकशाही आहे. ज्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्याबाजूने निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळालं. आता हे जे आपल्याला चिन्ह मिळालं, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण हे चिन्ह मिळविण्यात मी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सिंहाचा वाटा आमचा होता. त्यामुळं आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असे भुजबळ म्हणाले. 


खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका...


लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. यात जीव तोडून काम करावं लागेल. आपल्या कामाचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा विचार केला जाईल. एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येणार, अडचणी येणार, पण काळजी करू नका, असा सल्ला भुजबळांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ajit Pawar : सरडा रंग बदलतो, पण कुठं आलोय हेच विसरतो! शरद पवार गटाकडून अजित पवारांची थेट सरड्याशी तुलना