मुंबई : ‘भीमा-कोरेगाव दंगलीत दगडफेक करणारे संभाजी भिडेंचं नाव घेत होते, भिडे यांनीच चिथावणी दिली त्यामुळे हिंसाचार उसळला.’ असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.


‘आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही, मात्र अद्याप चौकशी बंद झालेली नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना एकप्रकारे क्लीन चिट दिली आहे. याचविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंवर आरोप केले आहेत.

‘भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भिडेंचीच चिथावणी’

‘आम्ही कधीच म्हटलं नाही की, भिडेंनी स्वत: दगडफेक केली. पण दगडफेक करणारे संभाजी भिडे यांचे नाव घेत होते. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की, या हिंसाचारामागे भिडे यांचीच चिथावणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते. ते पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावे.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून संभाजी भिडेंना क्लीन चिट

''भीमा- कोरेगाव या ठिकाणी मोठया प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. वढू या ठिकाणी समाधी तोडल्याप्रकरणी बोर्ड लावण्यात आला. ही घटना घडल्यानंतर त्या गावाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 'जय शिवाजी जय भवानी' अशी एका गटाची घोषणाबाजी सुरु होती. दुसऱ्या गटाला वाटलं की आपल्या विरोधात घोषणाबाजी करतात म्हणून त्यांनीही घोषणा देण्यास सुरवात केली. पोलिसांनी दोघांनाही बाजूला केलं. यात एका तरुणाची हत्या करण्यात आली. याच्या प्रत्येक क्लिप राज्य सरकार आणि पोलिसांकडे आहेत. भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पहिलं, असं एका महिलेने सांगितलं होतं. त्यानुसार तक्रार दाखली केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

भिडे गुरुजींविरोधात आतापर्यंत एकही पुरावा नाही : मुख्यमंत्री