Maharashtra Weather : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठं थंडीचा कडाका आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, सध्या काही भागात थंडीचा कडाका वाढलेला दिसत आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 13 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब होण्याची शक्यता होती. मात्र, तशी सध्या स्थिती नाही. फेब्रुवारी संपेपर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात एकापाठोपाठ, कमी दिवसांच्या अंतराने, मार्गक्रमण करणाऱ्या, तीव्र झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळं, हे घडत आहे. त्यामुळेचं उत्तर भारतात धुक्याचे प्रमाणही आता कमी होत आहे. संपूर्ण उत्तर भारतात आजपासून पुढील 5 दिवस म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात आणि त्याचबरोबर मध्य-भारत स्थित ' प्रत्यावर्ती वारा पॅटर्न ' च्या बदलातून तिथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फबारी आणि गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खान्देशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 270 किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे पश्चिमी' वाऱ्यांचे वहन अजुनही टिकून असल्याचे खुळे म्हणाले.
पहाटेच्या किमान तापमानात घट होणार
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 17 जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळं पहाटेच्या किमान तापमानात घट होवून 21 ते 23 फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या 3 दिवसात पुन्हा 17 जिल्ह्यात मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पहाटेचे किमान तापमान, सरासरीइतकेच राहून, त्या प्रमाणातच थंडी जाणवेल.
देशातील काही भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या: