कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करा : आमदार क्षीरसागर
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2016 10:17 PM (IST)
नागपूर : मुंबईतील सीएसटी आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या प्रस्तावानंतर, आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा, अशी मागणी कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. त्याबाबतचं निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलं. नुकतंच मुंबईतील ‘एलफिन्स्टन’ रेल्वे स्थानकाचं ‘प्रभादेवी’, ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) रेल्वेस्थानकाच्या नावात ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले.