औरंगाबाद : ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा अर्ज भरायचा राहिला असेल, त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील उपस्थित होते.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत, म्हणून सर्व पडताळणी करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. पण जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेतून काही कारणास्तव बाजूला काढले असतील, किंवा सिस्टीममधून बाहेर पडले असतील, त्यांच्यासाठी आमची एक समिती असेल. ही समिती त्या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेईल, आणि जर त्यांची नावं कर्जमाफीच्या प्रक्रियेतून चुकीने काढले गेले असतील, तर त्यांना पुन्हा एकदा यादी करून लाभ दिला जाईल.”

तसेच, ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा अर्ज भरायचा राहिला असेल, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, नागपूर अधिवेशनात विरोधकांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळाचाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. “खूप कार्ड खिशामध्ये आहेत. याचा विरोधकांनाही पत्ता नाही. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये जे काही करु, त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांना निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा मिळणार नाही,” असा टोला त्यांनी हाणला.

तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. दानवे म्हणाले की, “विरोधकांचा एक पाय तुरुंगामध्ये, तर एक पाय बाहेर आहे. म्हणून सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. कोंडून ठेवलेले उंदीर दरवाजा उघडल्यावर, जसे बाहेर पडतात, तसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून लोक बाहेर पडत आहेत,” असे त्यांनी यावेळी म्हणाले.