Chandrashekhar Bawankule नागपुर : राहुल गांधी (Rahul Gandhi) संपूर्ण देशातील ओबीसी (OBC) समाजाचा वारंवार अपमान करताना त्यांच्याच पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा आणि आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालय आणि महत्वाच्या शहरात भाजप तसेच ओबीसी मोर्चाच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात नागपुरात देखील असेच एक जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन्ही विरोधीपक्षातील नेत्यांवर घणाघात करत टीका केली.
ते म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चिड दिसून येते. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले. सोबतच उद्या शनिवार,10 फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजप काँग्रेस विरुद्ध जोरदार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही. ते गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले. भाजपने 2000 साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ओदिशामध्ये पोहोचली असतांना त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
पुढे राहुल गांधी म्हणाले, "सर्वात आधी मला हे सांगावं लागेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्मजात ओबीसी नाहीत. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील तेली समाजात जन्मला आले. आपल्या सर्वांना भयंकर बेवकूफ, मूर्ख बनवलं जात आहे. तेली जातीला भाजपने 2000 साली ओबीसीमध्ये समाविष्ट केलं. त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत. तरीही ते खोटं बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहेत. मला सर्टिफेकटची काहीही गरज नाही. मला माहिती आहे ते ओबीसी नाहीत. ते कोणत्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्याही शेतकऱ्याचा हात हातात घेत नाहीत, कोणत्या मजुराला हात लावत नाहीत. ते केवळ अदानींचा हात पकडतात. मोदी कधीही जातनिहाय गणना करु देणार नाहीत, हे मी लिहून देतो. जातीय गणना फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसच करु शकते"