Nagpur Violence : नागपूर शहरात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. येथे संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आहे. सोबतच जमावाने जाळपोळही केली आहे. याच घटनेदरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 


नेमकं काय घडलं? 


मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या महाल भागात संतप्त जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली आहे. या जमावाने काही गाड्यांनाही आग लावलेली आहे. यात मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच संतप्त जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधिकारीही घटस्थळी पोहोचले होते. यामध्ये पोलीस उपयुक्त निकेतन कदम यांचाही समावेश होता. त्यांच्यावर संतप्त जमावातील एकाने थेट कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. 


नागपुरात जमावबंदीचा लागू 


या जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेनंतर नागपुरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पोलिसांकडून असामाजिक घटकांची धडपकड केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 समाजकंटकांना ताब्यात घेतली आहे. सध्या नागपुरातील परिस्थितीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. कायदा कोणीही हातात घेऊ नये. कोणी समाजात तणाव निर्माण करत असेल, पोलिसांवर दगडफेक करत असेल किंवा शांती भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.


पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?


या घटनेवर पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणात सामील असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्वच पक्षांनी शांतता राखावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. सोबतच नागपुरात अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 



हेही वाचा :


नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन


मोठी बातमी! नागपूरमध्ये दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण!


औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी