Chandrapur Crime News : चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात (Municipal commissioner )एका  इसमाने स्वतःवर चाकूहल्ला केल्याने मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आयुक्त राजेश मोहिते दुपारी कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात गेला. कक्षात लक्ष्मण पवार आणि आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले. भेदरलेल्या आयुक्तांनी चपराशी आणि सुरक्षारक्षकांना जोराने आवाज दिला. यावेळी आतील दृश्य पाहून सर्व जण घाबरुन गेले. याबाबत तातडीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येत जखमीला ताब्यात घेतलं. लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. जुन्या आर्थिक वादातून ही घटना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून सिटी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

 


मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळी आयुक्त आपल्या कक्षात असताना लक्ष्मण पवारांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली. थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला. आत आयुक्त आणि पवार दोघेच होते. आयुक्तांनी अचानक सुरक्षा रक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षा रक्षकाने आत प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून तो देखील घाबरुन गेला. लक्ष्मण पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले. 



काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्यानं उपस्थित सगळेच घाबरुन गेले. अवघ्या काही वेळात मनपातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे धाव घेतली. घटनेनंतर लगेचच शहर पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. ते पोहचले आणि त्यांनी लक्ष्मण पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून पवार मोहितेंच्या भेटीला कशासासाठी आले, आयुक्तांच्या कक्षात त्या दोघात नेमके काय झाले, या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात समोर आल्यानंतरच स्वतःवरील चाकू हल्लाचे नेमके कारण समोर येईल. व्यक्तिगत वादातून हा प्रकार घडला आहे असे सांगण्यात येत आहे. आयुक्त मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी कामात व्यस्त आहे. नंतर सविस्तर माहिती देतो, असे सांगितले.
 


काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहिते यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला आहे. आयुक्तांच्या भेटीसाठी शहरातील समस्या घेऊन शिष्टमंडळ, नागरिक येत असतात. अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात. मात्र, आजपर्यंत अशा प्रकारचं कृत्य कधी झालं नव्हतं. या प्रकारामुळं मनपात खळबळ उडाली आहे. सोबतच या प्रकरणाची चर्चा शहरासह जिल्हाभरात होत आहे.