Chandrapur Lok Sabha Election 2024 चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून (Lok Sabha Election Seat Sharing) महायुती आणि महाविकस आघाडी मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अशात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituency) जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा सरतेशेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या पारड्यात पडली आहे.
प्रतिभा धानोरकर यांना ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसाला योगायोगाने अजब संयोग जुळून आला आहे. तो खास किस्सा स्वत: प्रतिभा धानोरकर यांनी सांगितला असून हा योग म्हणजे माझ्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिलीय.
उमेदवारी जाहीर होण्याचा असाही अजब संयोग
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी अखेर प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांना ज्या दिवशी उमेदवारी मिळाली तो दिवस होता 24 मार्च 2024. तर योगायोगाने 24 मार्च 2019 ला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना देखील याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली होती. विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये राज्यात केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या रूपाने एकमेव खासदार निवडून येण्यास यश आले होते. त्यामुळे एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज याच मतदारसंघाने राखली होती. मात्र, त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर पुन्हा त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांची वर्णी लागली असून उमेदवारीचा दिवस सारखा असल्याने हा क्षण म्हणजे माझ्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांचे नाव घेणे मुद्दाम टाळले?
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचा आज नागपुरात आगमन झालं. गेले अनेक दिवस उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून पक्षांतर्गत स्पर्धकांशी संघर्ष करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांचं स्वागत करण्यासाठी चंद्रपुरातून त्यांचे काही निवडक कार्यकर्ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. या क्षणी त्या काहीश्या भावनिक झाल्याचे देखील बघायला मिळाले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीचे आभार मानले. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि चंद्रपूरच्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रतिभा धानोरकर यांनी मुद्दाम विजय वडेट्टीवार यांचे नाव घेणे टाळले का असा प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या