चंद्रपूर: विरोधकांच्या संघर्षयात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकेची झोड उठवली आहे. जे मर्सिडीजमधून खाली उतरायला तयार नाही ते कसले संघर्षयात्रा काढणार? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते काल चंद्रपुरात बोलत होते.


‘यात्रेचं नाव संघर्ष ठेवल्याने काही होत नाही. हेतू आणि नियत चांगली असावी लागते. मर्सिडीजमधून खाली उतरायला तुम्ही तयार नाही. त्यामुळे तुमचा संघर्ष कसा आहे, हे लोकांनी बघितलं. त्यामुळेच लोकांनी तिकडे पाठ फिरवली.’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘विरोधकांना कर्जमाफी त्यांच्या बँकांमधील काळ्या कारभारावर पांघरूण घालण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हवी आहे.’ असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

‘सरकार कर्जमाफी देणार मात्र, शेतीत भांडवली गुंतवणूक करून, शेतकऱ्याला सक्षम करुन.’ असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने कर्जमाफीबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसात घ्यावा: अजित पवार

दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसात घ्यावा, अन्यथा विशेष अधिवेशन बोलवावं, आम्ही यायला तयार आहोत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल केली. पनवेलमध्ये संघर्षयात्रेची सांगता केल्यानंतर अजित पवार बोलत होते.

यूपीए सरकारने 71 हजार कोटींचं देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. त्याच प्रमाणे एनडीए सरकारनेही निर्णय घ्यावा. पैसा राज्यातून उभा करायचा की केंद्रातून हा त्यांचा प्रश्न आहे, पण कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.