बारामती : काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेक प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांना दिला आहे, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचं म्हटलं नाही, असं सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घूमजाव केलं. चंद्रकांत पाटील स्पष्टपणे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करायला लावल्याचं सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या अधिकाऱ्याचीही दिशाभूल केली असल्याचं म्हटलं जात आहे.


नितेश राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर केलेली चिखलफेक योग्य नसून कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये,असं आपण नारायण राणे यांना सांगितलं. नारायण राणे यांचा मला फोन आला होता, त्यावेळी ही कामं आपण चर्चेनं सोडवू शकतो, यामध्ये कायदा हातात घेण्याची गरज नव्हती, असं राणेंना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला. उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांना अटक झाली होती.

काय घडलं होतं?

नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं. सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या चिखलफेकीचा त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. नारायण राणेंनी लेकाच्या कृत्याबाबत माफीही मागितली होती.



बारामती जिंकण्याच्या दाव्यावरुनही यू टर्न

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार, असा दावा मी कधीच केला नव्हता, कारण बारामतीमध्ये अजितदादांनी केलेली विकास कामं पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणं हा आशावाद ठरेल. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे. त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो, असं सांगत या माझ्या विधानामुळे अजित दादांनाही निश्चित बरं वाटेल, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जोडली. बारामतीत अजित पवारांचा पराभव करणं शक्य नसल्याची एकप्रकारे कबुलीच चंद्रकांत पाटलांनी बारामतीत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना निम्म्या निम्म्या जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.