मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एस टी संघटना प्रतिनिधींना दिले आहेत.


एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमत ताटे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी शरद पवारांनी आश्वासन दिल्याचे एस टी संघटना प्रतिनिधींनी सांगितले. या भेटीत एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी थकीत वेतनाबाबत चर्चा केली व या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.



कोविड - 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना त्यांना मात्र तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. परिणामी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.


वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अथवा 7 तारखेपूर्वी वेतन देणं बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात वेळेवर वेतन न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास संघटनांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला आहे.