सिंधुदुर्ग : एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसंगी त्यांचं सार्वजनिक बांधकाम खातं नारायण राणेंना देण्याची तयारी दाखवली आहे. गणेशोत्सवापूर्वी कोकणातल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी चंद्रकांतदादा सावंतवाडीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की,राणेंना सार्वजनिक बांधकाम खातं हवं असल्यानं त्यांचा भाजप प्रवेश रखडला का?, त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, “मला हे खातं नकोच होतं. त्यामुळे पक्षाच्या आवश्यकतेपोटी असा विषय आला, तर माझी काही हरकत नाही.”

राणे आल्यास त्यांचं भाजपमध्ये स्वागतच करु : चंद्रकांतदादा

“राणेसाहेब भाजपमध्ये आले, तर आम्ही त्यांचं स्वागतच करु. पण राणेसाहेबांनी निर्णय घेतलाय की नाही, ते माहित नाही. आणि हा निर्णय इतका मोठा आहे, कारण राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला पक्षात घेणं, हा मोठा निर्णय असल्याने केंद्रीय स्तरावर अमितभाईच हा निर्णय घेतायेत.”, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. शिवाय, राज्याच्या कर्तृत्वान मुख्यमंत्र्याचा प्रवेश आम्हाला सगळ्यांना आनंदच देईल, असे सांगायलाही चंद्रकांतदादा विसरले नाहीत.

पाहा व्हिडीओ :