विधानसभेच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री पद मिळाल्याने बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात काय व्युहरचना आखली? असा प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी हे उत्तर दिलं.
मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं आज मी म्हणालो तर तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असेही ते म्हणाले. माझं लक्ष 2024 ची लोकसभा आहे. 2024 च्या लोकसभेला ब्रँडेड कमळावरचा खासदार असावा हे टार्गेट आहे, असेही ते म्हणाले.
माझं 2019 विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो, असं पाटील म्हणाले. अजित पवार हे ज्याप्रकारचे नेते आहेत. बारामती शहरातील त्यांचं स्थान, त्यांच्या कामाच्या व्यापकतेकडे चंद्रकांत पाटलांनी बोट दाखवलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र आम्ही बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल सांगलीतील कार्यक्रमात केले होते. आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र ते थोडक्यात वाचले असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पवारांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उध्वस्त केलं असल्याचं पाटील म्हणाले होते.