Pune Crime news : 22 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन (Nijerian) व्यक्तीला कोकेन या अमली पदार्थाची विक्री (Pune Crime news) केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या नायजेरियन व्यक्तीकडून 2 कोटी 20 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर पाेलिसांच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने उंड्री भागातून अटक केली आहे. फाॅलरिन अब्दुल अजीज अंडाेई असं 50 वर्षीय अटक केलेल्या आराेपीचं नाव आहे. काेंढवा पाेलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाॅलरिन हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती अमली पदार्थ विराेधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून काेकेन, इलेक्ट्राॅनिक वजन काटे, कार, सहा माेबाईल फोन असा एकूण 2 काेटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2019 मध्ये पुण्यातील चतु:श्रुंगी पाेलीस ठाणे हद्दीत काेकेन विक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.


अधिक माहितीनुसार, 2000 मध्ये फाॅलरिन बिझनेस व्हिसावर नायजेरियातून भारतात आला. भारतीय कपडे नायजेरियात जाऊन विक्रीचा व्यवसाय करत हाेता. 2014 मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागाने त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला. त्यामध्ये व्हिसा आणि पासपाेर्ट जप्त करण्यात आला. तेव्हापासून ताे भारतात लपून राहत हाेता. 2019 मध्ये पुन्हा ताे काेकेन विक्री करताना पाेलिसांच्या हाती लागला होता. 


नायजेरियन गुन्हेगारांचा पुण्यात धुमाकूळ
यापूर्वी पुण्यातल्या बाणेरमधील नालंदा गार्डन या ठिकाणी एक नायजेरियन पती-पत्नी राहत होते. राहत्या घरातून कोकेन, एमडी असे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत या नायजेरियन पती-पत्नीला ताब्यात घेतले होते. पती उगुचुकु इम्यन्युअल तर पत्नी ऐनीबेली ओमामा व्हीआन अशी दोघांची नावं होती. ते मूळचे नायजेरियन आहेत. सध्या राहायला ते बाणेरमध्ये होते. त्यांनी पुण्यात या अमली पदार्थांचा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना त्याआधीच ताब्यात घेतले होते. बेकायेशीररित्या पुण्यात विकण्यासाठी आणलेल्या 644 ग्रॅम एमडी, 201 ग्रॅम कोकेन, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या आणि डबा असा 1 कोटी 31 लाख 8 हजार रुपयांचा अंमली पदार्थ आणि ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. एनडीपीसी ॲक्ट नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.