कोल्हापूर : भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय, ते त्यांनी ठरवावं, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला चर्चगेटला रेल्वेच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले. शिवाय, त्यांनी रेल्वेमंत्र्यांसह भाजपवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय.”, शिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
“इथे लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला.
मुंबईत चेंगराचेंगरी
एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.