Vitthal Rukmini temple Pandharpur : राज्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक दिवसापासून तापमानाचा पारा चढताच आहे. या उष्म्याचा दाह देवाला जाणवू नये म्हणून परंपरेप्रमाणं पंढरपूरच्या विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली आहे. वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाणवू लागली असताना मंदिर समितीनं परंपरेनुसार विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात केली. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याहस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पूजा पार पडली.
आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्यानं विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल अशा चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो. यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदनउटीची पूजा होत असते. विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज ही पूजा होणार असून, देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणेच रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, शासनानं निर्बंध उठवल्यानं दोन वर्षानंतर आजपासून भाविकांना ही चंदन उटी पूजा करता येणार आहे. देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्रॅम उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते.
दरम्यान, राज्यातील उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. याचा नागरिकांना त्रास होताना दिसत आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं आहे. तर काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. काल सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली. हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. विदर्भातील गडचिरोली वगळता अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असून आवश्यकता असेल तरच दुपारी घराबाहेर पडावं, असं आवाहन हवमान विभागाकडून करण्यात आलं आहे.