पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर ‘चंपाषष्ठी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या “देवदिवाळी” महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. चंपाषष्ठी निमित्त लाखो भाविकांनी आज जेजुरीत गर्दी केली.


जेजुरीच्या खंडोबाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे ‘चंपाषष्ठी’. सहा दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. गडावर हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. भंडाऱ्याच्या पिवळपणाने जेजुरी सोन्याची नगरी भासू लागली आहे.

पुराणातील कथेनुसार ‘मणी आणि मल्य’ या अतिक्रूर प्रवृत्तीच्या दानवांशी सलग सहा दिवस शिवशंकराने मार्तंडभैरव अवरात घेऊन तुंबळ युद्ध करून या दोन्ही दानवांचा आपल्या ‘खड्ग (भलीमोठी तलवार)’ शस्त्राने त्यांचा वध केला, हाच तो ‘चंपाषष्ठी’चा विजयी दिवस.

या दुष्टराक्षसांचा सर्वनाश करून या दैत्याद्वारे त्रस्त झालेल्या महंतदेव, संत, साधु आणि जनांची सुटका झाली आणि आपल्या अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक संस्कृतीचं रक्षणही झालं. त्याक्षणी या विजयोत्सवानिमित्त देवदेवता, साधु-संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं, हळदीचा वर्षाव केला गेला. त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून ‘येळकोट’ नामाच्या गर्जनेत कित्येत शतकांपासून चंपाषष्ठीच्या दिवशीच्या या उत्सवात ही प्रथा पाळली जाते.