शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीजवळील राहाता शहरात पोलिसांवर गोळीबार करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार केला आहे. गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतरही पोलिसांनी कारवाई सुरुच ठेवली. दरम्यान, एका आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रीरामपूर येथील सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील सचिन ताके या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नगरमध्ये सध्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज शिर्डीजवळील राहाता शहरात दोन युवक दुचाकीवरून जात होते. तिथे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्याचवेळी दुचाकीवरील सचिन ताके या आरोपीने त्याच्याजवळील गावठी पिस्तुलाद्वारे पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये कॉन्स्टेबल अजित पठारे यांच्या गालाजवळ गोळी लागली. परंतु जखमी अवस्थेत पठारे आणि त्यांचे साथीदार शेख यांनी आरोपींचा पाठलाग केला आणि गोळीबार करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले.
दरम्यान, पोलीस आणि आरोपीमध्ये झालेल्या झटापटीत आरोपीने पुन्हा एकदा गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी पठारे यांच्या हातात लागली आहे. गोळीबार करणारा आरोपी सचिन ताके हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. तर जखमी पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे यांना उपचारांसाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार, जखमी अवस्थेत पोलिसांची जिगरबाज कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2019 05:23 PM (IST)
नगरमध्ये सध्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज शिर्डीजवळील राहाता शहरात दोन सोनसाखळी चोरांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -