Section 144 at Lohgad Pune : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर (Lohagad fort) होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरुस साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. लोहगड किल्ल्यावर तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. गडावरील दर्ग्याच्या उरुसला नाकारलेली परवानगी आणि ही दर्गा अनधिकृत असल्याने इथे उरुस भरु देणार नाही असं सांगत बजरंग दलासह इतर संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुसाला परवानगी नाकारली
6 जानेवारीला लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुस भरणार होता. त्यासाठी आयोजकांनी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली आहे. लोहगडावरील दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळे प्रतापगडाप्रमाणे इथलंही अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावं, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे, असं कलम 144 ची नोटीस काढताना उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्केनी नमूद केलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संघटनांना आणि नागरिकांना सूचना दिल्या आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद होतील अशा घोषणांवर बंदी घातल्याच्या सूचना दिल्या आहेत. उरुस झाला तर वाद निर्माण होईल त्यातून राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरुसाला परवानगी नाकारली आहे आणि 144 लागू केले आहे.
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचना
- 1) कोणीतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहिल.
- 2) लोहगड आणि घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहिल.
- 3) परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तिंनी जमा होऊ नये.
- 4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा/भाषण करु नये.
- 5) संबंधित परिसरामध्ये मोर्चा/आंदोलन करण्यात येऊ नये.
- 6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधींसाठी पशुपक्षांचा बळी दिला जाऊ नये.
- 7) संबंधित परिसरामधील ऐतिहासिक आणि सार्वजनिक वस्तुंचे नुकसान करण्यात येऊ नये.