Free Ration in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंत्योदय (Antyodaya Anna Yojana- AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा मिळणारे धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी होईल. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ व 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (National Food Security Act) नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात.  


केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरपर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहिल. दरम्यान, या वर्षाच्या 31 डिसेंबरला संपणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मोफत रेशन योजनेला मात्र मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


या योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिमाणसी 3 किलो तांदूळ, तर 2 किलो गहू दिला जाईल. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू मोफत दिला जाईल. उद्यापासून प्रत्यक्ष जानेवारीचे मोफत धान्य वाटप सुरू होईल. यासह डिसेंबर महिन्यातील शिल्लक धान्याचेही वाटप होईल. सध्या रेशनमध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. कोरोना कालावधीत या व्यतिरिक्त कोरोना कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 28 महिने अतिरिक्त धान्य मोफत देण्यात आले. आता ही योजना बंद झाली असून जानेवारी ते डिसेंबर या एक वर्षांच्या कालावधीसाठी नियमित धान्य मोफत दिले जाणार आहे.


दुकाने चालवायची कशी?


दुसरीकडे, आर्थिक उलाढाल बंद होणार असल्याने दुकाने चालवायची कशी, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे.  मोफत धान्य वाटपासाठी दुकानदारांना कमिशन दिले जाणार आहे. मात्र, ते कमिशन दर महिन्याला द्यावे, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. यापूर्वी 28 महिने मोफत धान्य वाटप केले. त्याचे वर्षभराचे कमिशन अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे दुकानदार धास्तावले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या