मुंबई : कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. 14 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.  100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  






 


सीबीआय अधिकारी काल (11 एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना DRDO मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे,  महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 


परमबीर सिंह यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबानं केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. 


सचिन वाजे आणि मीना जॉर्ज याची डायरी सीबीआयच्या ताब्यात
सीबीआयने सचिन वाझेच्या केबिनमधून मिळालेली डायरीही सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीत त्याच्या सर्व वसुलीचा रेटकार्डचा उल्लेख आहे. तसंच कोणासोबत किती रुपयांचा व्यवहार झाला ही बाबही नमूद करण्यात आली आहे. तर सचिन वाझे यांची निकटवर्ती महिला मीना जॉर्जच्या घरातूनही एनआयएला डायरी मिळाली होती. ती डायरही सीबीआयने एनआयएकडून आपल्या ताब्यात घेतली आहे.