मुंबई : मुंबईचे माझे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या सीबीआयने आज परमबीर सिंह, याचिकाकर्ता जयश्री पाटील, सचिन वाझे आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे जबाब नोंदवले आहे. तर लवकरच बड्या नेत्यांची ही चौकशी सीबीआयकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला शंभर कोटीच्या वसुलीचा टारगेट दिल्याचा दावा केला होता. ज्यानंतर परमबीर सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ज्या नंतर उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
6 एप्रिलला सीबीआयचे चार अधिकारी मुंबईत पोहोचले, त्यांनी सर्व कागदपत्र तयार करून तपासाची दिशा ठरवली ज्या नंतर 7 तारखेला याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. 100 कोटींच्या वसूली संदर्भात न्यायालयामध्ये तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या पैकी परमबीर सिंह आणि घनश्याम उपाध्याय या दोघांची याचिका फेटाळून न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. ज्यामुळे जयश्री पाटील यांचा जबाब सीबीआयने नोंदवला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सचिन वाझेंना शंभर कोटीचा वसुलीसाठी गृहमंत्र्यांनी सांगितला होता. ज्यामुळे सचिन वाझेंची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. तसेच एन्फॉर्समेंटचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना सुद्धा गृहमंत्र्यांनी बंगल्यावर बोलून शंभर कोटींच्या वसुली संदर्भात सांगितले होते असा दावा परमबीर सिंह यांनी आपल्या आरोपांमध्ये केला होता.
परमबीर सिंह, जयश्री पाटील, आणि संजय पाटील यांची चौकशी सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली. तर सचिन वाझेंची चौकशी NIA कार्यालया मध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सीबीआयच्या तपासाची दिशा कशी असणार आहे तसेच सीबीआयच्या रडारवर अजून कोन व्यक्ती येत आहे ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे.