नाशिक : पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर बँकेच्या कॅशिअरने बुट फेकला आहे. मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाणमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्याला कॅशिअरचा बुट खावा लागला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.


मालेगावच्या दहिदी गावातील शेतकरी सोपान वाघ यांना पत्नी आजारी असल्यामुळे पैशांची गरज होती. बँकेतील अकाऊंट पत्नीच्या नावे असल्यानं आजारी पत्नीकडून भरुन घेतलेली स्लिप त्यांनी बँकेत जमा केली, पण बँकेत पैसे नसल्याचं कारण देत त्यांना दुसऱ्या दिवशी बँकेत येण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी बँकेत मोठ्या रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांना स्लिपवर पत्नीकडून सोपान यांच्याकडे पैसे द्या असं लिहून आणण्यास सांगण्यात आलं.

आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे हवे असल्यानं सोपान वाघ यांनी चार किमी लांब जाऊन पत्नीकडून तसं लिहूनही आणलं. मात्र या साऱ्या प्रकारानंतर कॅशिअरनं सोपान यांना पत्नीला घेऊन आल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं. या कारणानं सोपान आणि कॅशिअरमध्ये शाब्दिक चकमक झाली. रागाच्या भरात कॅशिअरनं सोपान वाघ यांच्यावर बुट फेकून मारला.

याप्रकरणी सोपान वाघ यांनी कॅशिअर विरोधात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच या बँकेत ग्राहकांना वेळेत पैसे दिले जात नसल्याचाही आरोप ग्राहकांनी केला आहे.