उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरातील जामदार खान्यातील देवीच्या खजिन्यात ठेवलेले अतिप्राचिन अलंकार, वस्तू, दुर्मीळ नाणी, भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी दागिने व अतिप्राचीन 71 नाणे याचा वैयक्तिक कारणासाठी अपहार करुन चोरी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अखेर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला आहे.


कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दुर्मिळ खजिन्यातील अतिप्राचीन अलंकार नाणे गायब झाल्या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर या बाबतीत चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने यास तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना जबाबदार धरुन त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्यावर तब्बल दोन दिवसाने प्रशासकीय अधिकारी योगिता कोल्हे यांनी गुन्हा दाखल केला.


या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातीलअतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच उपरोक्त 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.