नांदेड : नांदेडहून भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी निघालेल्या मोटारसायकल अभिवादन रॅली काढणाऱ्या 17 जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजिराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.


दरवर्षी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी नांदेड ते भीमा कोरेगाव अशा मोटरसायकल अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही रॅलीचे आयोजन आले होते. रॅलीचे प्रमुख श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वात नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाले असता वजिराबाद पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या रॅलीला मजाव केला. आणि रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


आज सकाळी हि रॅली भीमा कोरेगावच्या दिशेने जाणार होती. नियमांचे पालन करत तरुण-तरुणीची एक टीम या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. परंतु पोलिसांनी त्यांना नांदेड येथे ताब्यात घेतलं आहे. भीमा-कोरेगाव येथे गौरव गाथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व शोर्य दिनाचे औचित्य साधून मानवंदना देण्यासाठी नांदेड शहरातून दुचाकी रॅली आयोजित केली होती.


या प्रकरणात 17 जणांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये श्याम निलंगेकर, गंगाराम मिसाळे, विनोद वाघमारे, प्रकाश गजभारे, प्रमोद कोलते, प्रमोद आठवले, सुनील पैठणे, जयपाल पंडित, रश्मी निलंगेकर, प्रीती हाटकर, अविनाश धडेकर, दीपक पोळे, जयदीप पैठणे, प्रकाश वाघमारे, सुलक्षणा भवरे, रुचिका निलंगेकर, पल्लवी जोंधळे याचा समावेश आहे.