आमदार माधुरी मिसाळ यांच्या दीरावर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2016 07:04 AM (IST)
NEXT PREV
पुणे: भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दिपक ऊर्फ बाबा मिसाळ यांच्याविरोधात कोंढवा पोलीस स्थानकात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. डॉ. अमजद बडगुजर हे फिर्यादी आहेत. त्यांची मौजे महमंदवाडी रस्त्यावर ३ हजार सातशे चौरस मीटर जागा आहे. ही जागा खरेदी करताना दीपक मिसाळ यांची लगतच असलेली जागादेखील विकत घ्या असंही दिपक मिसाळ यांनी बडगुडर यांना विचारलं होतं. पण आहे ती जागा ठिक आहे असं म्हणत त्यांनी अधिकची मिसाळ यांची जागा खरेदी केली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी बडगुजर यांच्या जागेवर मिसाळ यांनी कपाऊंड बांधून त्यावर त्यांचा बोर्ड लावला. एवढंच नाही तर वॉचमनसाठी बांधण्यात आलेली खोलीही तोडली असा आरोप बडगुजर यांनी तक्रार अर्जात केला आहे. यावरून कोंढवा पोलीस स्थानकात दीपक मिसाळ यांच्याविरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलण्यासंदर्भात पोलीस मात्र टाळाटाळ करत आहेत.