सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिश्रखतांचा पुरवठा केल्याबद्दल लोकमंगल बायोटेकचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 420 आणि 34 या कलमान्वये तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तीन व सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यात विकली जाणारी अनेक मिश्रखतं कृषी विभागाच्या रडारवर होती. परंतु आता गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठवाड्यातील लाखो रुपयांची मिश्रखतं जप्त करण्यात आली आहेत.

मराठवाड्यात विकले जाणारे 18:18:10, 20:20:0 व 10:20:20 ग्रेडच्या मिश्र खतांची कृषी खात्याकडून तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर लाखो रुपयांचे खत जप्त करण्यात आले. खत उत्पादन आणि विक्रीत गंभीर बाबी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले. त्यानुसार लोकमंगल बायोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीतील सहा नमुने अप्रमाणित निघाले. त्यामुळे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर मी नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. तर सुभाष देशमुख जरी थेट संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे नातेवाईक किंवा सहकारीच लोकमंगलच्या संचलाकपदी आहेत. त्यामुळे सोलापुरातल्या लोकमंगलच्या सर्वच निर्मितींवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा