Beed News: नुकतीच राज्यभरात शिवजयंती (Shivjayanti 2022) उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यभरातील शिवभक्तांनी विविध गडकिल्ल्यांना भेट देत स्वच्छता मोहिम राबवली. दरम्यान बीडमधील धारूर किल्ल्याला शिवभक्तांनी भेट दिली असता, काही काळापूर्वी त्याठिकाणी ठेवलेले तोफ गोळे गायब झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे शिवभक्तांनी संताप देखील व्यक्त केला आहे.


काही दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी या धारुर किल्ल्याला भेट देत त्याठिकाणी साफसफाई करत अस्ताव्यस्त पडलेले तोफगोळे जमा करून 15 दगडी तोफगोळे किल्ल्यातीलच एका खोलीत ठेवले. ज्यानंतर पुन्हा एकदा धारूरच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवप्रेमींनी गड स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी मात्र किल्ल्यातील अनेक दगडी तोफ गोळे गायब असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसंच पुरातत्व विभागाने लवकरात लवकर हा किल्ला संरक्षित नाही केला, तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मनसे चित्रपट सेनेने दिला आहे.


कसा आहे किल्ले धारुर?


बीड जिल्ह्यात एकमेव किल्ला म्हणून धारूर किल्ल्याला (Dharur Fort) ओळखले जाते. किल्ल्यामुळेच धारूरची  ‘किल्ले ए धारूर’ अशी ओळख निर्माण झाली. बीड जिल्ह्यातील धारूर येथील भुईकोट किल्ला एक महत्वाची वास्तु आहे. आदिलशाहीमधील सेनापती किशवरखान याने हा किल्ला 1569 मध्ये बांधला. किल्ल्यास मिळालेली उत्तम भौगोलिक रचना आणि त्याची भक्कम बांधणी यामुळे हा किल्ला त्या काळात संरक्षण दृष्ट्या महत्वाचा मानला जात होता. किल्ल्याची मुख्य भिंत डोंगराच्या कडेवर शंभर फुटाहून अधिक उंच आहे. भिंतीला लागूनच खोल दरी आहे. किल्ल्यावर पंचीवीसहून अधिक टेहळणी बुरज आहेत. किल्ल्यात गोड्या पाण्याचे तळे आणि खाऱ्या पाण्याचे तळे आहे. ज्यांना खारी दिंडी आणि गोडी दिंडी म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावर उत्तरेकडील बुरूजावर असलेली आईना महल नावाची वास्तु काही वर्षापूर्वी जमीनदोस्त झाली. बालाघाटवर ताबा ठेवण्यासाठी धारूरचा किल्ला महत्वाचा मानला जात होता.  


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha