परीक्षेत कॉपी करताना पकडलेला उमेदवार पोलिसांच्या तावडीतून फरार
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2018 10:01 PM (IST)
चौकशीच्या कामासाठी या उमेदवाराला बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र लघु शंकेला जातो असं सांगून या आरोपीने पळ काढला.
बुलडाणा : एसआयडी या गुप्त वार्ता विभागाच्या परीक्षेत कॉपी करत असताना अटक करण्यात आलेला आरोपी आज लघु शंकेला जातो असं सांगून शेगाव ग्रामीण पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. त्याचा नागरिकांसह पोलिसांनी पाठलाग केला, मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. शेगाव-खामगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजमध्ये 13 जुलै रोजी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या ऑनलाईन परीक्षेत तीन जणांनी संगणकावरील प्रश्नाचे फोटो काढून त्याची नक्कल केली होती. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नेटवर्क इंजिनीयर संदीप पायघन यांच्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तीन जणांना अटक केली. अटकेतील आरोपींना चौकशीच्या कामासाठी बाहेर काढलं होतं. यातील गोपाल कृष्णा जंजाळ (वय 27 रा. चिंचपुर ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं. त्याच्या शोधात पथके रवाना करण्यात आली. मात्र शोध घेऊनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली.