बुलडाणा : महाराष्ट्र पोलीसांनी आता एक पाऊल पुढे टाकत आपल्या ताफ्यातील वाहने अद्यावत करण्यास सुरवात केली आहे. परदेशातील पोलीसांच्या वाहनांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांनी आपल्याकडील वाहनांवर कॅमेरे आणि MVDR अर्थात मोबाईल व्हिडीओ डिजिटल रेकॉर्डर सिस्टीम बसवण्यास सुरवात केली आहे. यामध्ये मागील दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या वाहनांवर कॅमेरे बसविण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.
आता हे कॅमेरे रस्त्यांवर होणाऱ्या विविध घटनांवर नजर ठेवणार आहे. पोलीस विभागात गत काही दिवसांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसत आहे. त्यामध्ये बुलडाणा पोलीस दलाच्या वतीने पोलीस व्हॅन व अधिकाऱ्यांकडे असलेली वाहने हायटेक करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शेगांव, खामगांव, संग्रामपुर, जळगांव, सोनाळा, जलंब, मलकापूर, नांदुरा, मोताळा, बुलडाणा, बोराखेडी, देऊळगांव राजा, रायपुर, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, बिबी, अंढेरा, हिवरखेड, अमडापूर यासह एकुण 20 पोलीस ठाण्यांमध्ये असलेली मुख्य वाहने व उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या वाहनांसाठी जीपीआरएस सिस्टीम व एचडी प्रणालीचे कॅमेरे देण्यात आले आहेत. जीपीआरएस सिस्टीमचा उपयोग दिशादर्शकसाठी कामी पडणार असून पोलीसांचे वाहन सध्या कोठे आहे हे जिल्हा मुख्यालयाला कळणार आहे.
वाहनांवर बसवण्यात आलेले कॅमेरे हे उच्चस्तरीय असल्याने वाहनाच्या चारही बाजुचे चित्रीकरण होणार आहे. यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नजरेतून सुटलेले गैरप्रकार या कॅमेऱ्यातत कैद होणार आहेत. एकूण या सर्व प्रणालीचा फायदा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी होणार आहे. जिल्हा पोलिसांच्या वतीने दर आठवड्यात एकदा या यंत्रणेचा आढावा घेतल्या जाणार असून यातील व्हीडीओ चित्रीकरणाचा डाटा संग्रहित केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
चौकट रात्रीच्या हालीचालीही होणार कैद पोलीस प्रशासनाच्या वाहनावर बसविण्यात आलेले कॅमेरे हे उच्च दर्जाचे व नाईट व्हिजन चित्रीकरणाची सोय त्यामध्ये असल्याने हे कॅमेरे स्पष्ट चित्रीकरण करू शकतात. शहरात होणारी भांडणे, दंगली नंतर कारवाईसाठी या कॅमेऱ्याचा महत्वपूर्ण उपयोग होणार आहे मुलींवरील अत्याचार गुन्हे महिला वरील अत्याचार या वर प्रतिबंध करणे सोपे जाईल असे पोलिसांचे मत आहे एकंदरित सध्या पोलिस विभाग कात टाकत आहे आणि हायटेक होत आहे एवढे नक्की.