मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी आणि नव्या दमाच्या नेत्यांचं कॉम्बिनेशन मंत्रिमंडळात असलं पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. अशोक चव्हाण आज 'एबीपी माझा'च्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही खातेवाटपाचा निर्णय का होत नाही? आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दोन्ही चव्हाणांचं नेमकं काय होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 12 कॅबिनेट मंत्रिपदं आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याचा सस्पेन्स अजून कायम आहे. अशावेळी अशोक चव्हाणांनी या सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणं गरजेचं असल्याचं देखील सुचवल आहे.

एकीकडे स्वतःच्या पक्षाला अशोक चव्हाणांनी सूचनावजा सल्ला दिला. तर तिकडे शिवसेनेला देखील सूचक इशारा देखील दिला आहे. संविधानाच्या मूल्यावर आधारीत कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात एकसूत्री कार्यक्रमाची चौकट मोडली तर निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडीच सरकार आलं, पण खातेवाटपाला विलंब का? या प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, खातेवाटपाविषयी कोणताच वादाचा विषय नाही. तिन्ही पक्षांना काम करण्याची संधी हवी. तिन्ही पक्षांची हीच इच्छा आहे. जनतेसाठी जास्तीत जास्त काम करता यावं, असे खाते आपल्याला मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. काही महत्त्वाच्या खात्यावर चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असताना कोणतेही काम थांबलेल नाही. कॅबीनेटच्या बैठका सुरू आहेत. पाच वर्षे सरकार टिकवण्यासाठी एकवाक्यता येण गरजेचे आहे.

कर्नाटक, गोवा राज्यात जे काही घडलं ते पाहता यापुढे भाजप काय करु शकतं हे गृहीत धरून आम्ही आमचं नियोजन केले आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चालण महत्त्वाच आहे. आमच सरकार हे संविधानाच्या चौकटीत राहून काम करेल अस अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे.

पक्षांतर केलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायच असेल तर त्यांच्याविषयी पक्षाला विचार करावा लागेल. त्यांच्याविषयीचा पूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. अजित पवारांच्या पक्षांतरावर बोलताना चव्हाण म्हणाले, अजित पवारांची काळजी त्यांच्याच पक्षांनी घ्यावी.