माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुणे भोसरी येथील MIDC ची जमीन घेतल्याचा आरोप झाला. या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश दिनकर झोटिंग यांची समिती नेमली. या समितीने यावर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. पण या अहवालात पुढे काय झालं, याची विचारणा एकनाथ खडसे यांच्यासह विरोध पक्षातील नेतेही करत होते.
मुख्यमंत्र्यांनी अखेर झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं विधानसभेत सांगितलं. कारण या जमिनीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आधीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. लाचलुचपत विभाग याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळेच झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं सांगत, या अहवालामुळे स्वतःवर येणारी जबाबदारी झटकण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले.
खडसे यांच्यावर झोटिंग समितीच्या अहवालानुसार कारवाई करावी लागली असती तर एकनाथ खडसे यांचा अजून रोष मुख्यमंत्र्यांवर ओढवला असता. पण याप्रकरणी कोर्टानेच आदेश दिल्यामुळे पुढील कारवाई होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामुळे यापुढे होणाऱ्या मंत्रिमंडळात तरी परत येण्याचे एकनाथ खडसे यांचे दरवाजे बंद झाले.
झोटिंग समितीने जुलै महिन्यात अहवाल देऊनही या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं होतं. समितीने एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवून कारवाई करायला सांगितलं असेल तर ते मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचं ठरलं असतं. पण हायकोर्टानेच खडसेंवर गुन्हा दाखल करायला सांगितल्याने मुख्यमंत्र्यांची यातून सुटका झाली.
लाचलुचपत विभाग त्यांच्या स्तरावर कारवाई करणार असल्यामुळे या प्रकरणातून एकनाथ खडसे यांची लवकर सुटका शक्य नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात त्यांचे परतीचे दरवाजे आता बंद झाले असेच म्हणावं लागेल. झोटिंग समिती नेमल्यानंतर कुठे तरी परतीची आस लावून बसलेल्या एकनाथ खडसे यांचं भविष्य आता लाचलुचपत विभाग या प्रकरणात पुढे काय कारवाई करते, यावरच अवलंबून असेल.
भोसरी जमीन खरेदी प्रकरण काय आहे?
भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं.
महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.