जळगाव :  बँकेत कर्मचारी असल्याची बतावणी करून मुलीच्या कुटुंबियांची फसवणूक करून विवाह करणारा तरुण हा कर्मचारी नसून बँक परिसरात चोरी करणारा चोर असल्याचं समोर आले आहे. चोरी करताना पकडला गेल्यानंतर लोकांनी केलेल्या मारहाणीनंतर समोर आल्याने पत्नीसह त्याच्या सासरच्या मंडळींना डोक्याला हात मारून घेण्याची वेळ राहुल चौधरी या तरुणाने आणली आहे.


आपण पूर्वी बीएसएफमध्ये नोकरी करीत होतो. ती सोडून आता एका खासगी बँकेत कर्मचारी असल्याच भासवून राहुल चौधरी या भामट्याने दोन वर्षा पूर्वी एका तरुणी सोबत विवाह केला होता. विवाहानंतर दोन वर्षापर्यंत आपला पती हा बँकेत कर्मचारी असल्याच त्याच्या पत्नीला आणि सासरच्या मंडळींना वाटत होतं. मात्र तो बँकेत कर्मचारी नव्हे तर बँकेच्या परिसरात लोकांच्या बॅग लांबविणार चोरटा निघाल्याने आणि बँक कर्मचारी असल्याच सगळा बनाव असल्याच उघड झाले आहे.

जळगाव शहरातील काव्यरत्नवाली चौकात असलेल्या एचडीएफसी बँकेत खाते असलेल्या धनराज पुरोहित यांनी आपल्या खात्यातून दोन लाख रुपयांची रोकड काढून ते घरी परतण्याचा मार्गावर होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या आणि मोटारसायकल वरून आलेल्या राहुल चौधरीने पुरोहित यांच्या हाताला जोरदार हिसका मारून त्यांची बॅग पळवण्याचा काल प्रयत्न केला. मात्र पुरोहित यांनी शेवट पर्यंत बॅग आपल्या हातात पकडून ठेवल्याने राहुल चौधरी याने त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी वरून खाली पडला. यावेळी पुरोहित यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याची नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.


काही वेळा नंतर राहुल हा शुद्धीवर आल्यावर त्याची आरोग्य तपासणी केली असता त्याच्या खिशात बीएसएफ कर्मचारी असल्याच बनावट आयकार्ड पोलिसांना मिळून आले. बेरोजगार असल्याने आपण चोरीचा प्रयत्न केल्याचं राहुलने पोलिसांना सांगितलं आहे. आपल्या पतीला अपघात झाल्याची माहिती सुरुवातीला कोणतीतरी त्यांच्या पत्नीला सांगितल्याने त्या धावपळ करत दवाखान्यात आज दाखल झाल्या. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत कर्मचारी म्हणून वावरत असलेला पती थेट चोरीच्या गुन्ह्यात अडकला गेल्याने आपली फसवणूक करणाऱ्या या उचापती पतीच्या प्रतापा मुळे त्याची पत्नी आणि सासरची मंडळी यांना मात्र चांगलाच धक्का बसला असल्याच पाहयला मिळत आहे. या अगोदर देखील राहुल चौधरी ने काही गुन्हे केले आहेत का त्याचा तपास आता रामानंद नगर पोलीस करीत आहेत.