सोलापूर : महाडमधील पूल दुर्घटनेची आठवण करुन देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. सोलापुरात जोरदार पावसामुळे बंदलगी बंधाऱ्यावरचा पूल तुटला. मात्र वेळीच गावकऱ्यांचं लक्ष गेल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
सोलापुरातल्या या घटनेनं महाडचा आक्रोश डोळ्यासमोर आणला. सुदैवानं या घटनेत कुणाचाही जीव गेला नाही. मुसळधार पाऊस आणि सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यानं भोगावती नदीला पूर आला. त्यामुळे बंदलगी बंधाऱ्यावरचा पूल तुटला.
वेळीच गावकऱ्यांचं लक्ष गेल्यानं मोठा अनर्थ टळला. कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलाची ही अवस्था झाल्यानं 24 गावांचा संपर्कही तुटला आहे. 1987 मध्ये बंदलगी बंधारा बांधण्यात आला. मात्र डागडुजीचं काम लालफितीच्या कारभारात अडकल्याचं अधिकारीही मान्य करतात.
बंधारा पूर्ण भरल्यानं गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी यंदा आनंदित झाला. मात्र आता असं पाणी वाहून जात असल्यानं शेतकऱ्याच्या आनंदावर विरझण पडलं आहे.
महाड दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं राज्यभरातल्या पुलांची पाहणी करण्याचे आदेश दिले. मात्र आता बंधाऱ्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण महाडची ती काळरात्र सांगून येणार नाही.