BULLET TRAIN PROJECT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train Project) मार्गातील एक एक अडथळा हळू हळू दूर होतोय. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारने मोदी सरकारला एक मोठं गिफ्ट दिलेय. महाराष्ट्र सरकार बुलेट ट्रेनचा 25 टक्के खर्च उचलणार आहे. राज्याकडून बुलेट ट्रेनसाठीचे सहा हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. 


मुंबई ते गुजरात दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकार 50 टक्के तर गुजरात आणि महाराष्ट्र राज्य प्रत्येकी 25 टक्के खर्च करणार आहे. यापैकी राज्य सरकारचे सहा हजार कोटी वितरीत करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारकडून मोदी यांना एकप्रकारे गिफ्ट देण्यात आले आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात बुलेट ट्रेनचा प्रकल्प रखडला होता. शिंदे-फडणवीस सरकार येताच याला पुन्हा एकदा गती आलेली आहे. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. हे सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचं? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. 


काय म्हणाले नाना पटोले?
सहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी देऊ केले आहेत. पहिल्याच कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेन संदर्भात काम सुरू करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रातले सरकार हे गुजरातसाठी तयार झालं आहे काय? सरकार हे असवैधानिकच आहे.. राज्यात ओला दुष्काळ आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे. अजूनपर्यंत पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांना मदत नाही पण बुलेट ट्रेनसाठी मात्र सहा हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करायला निघालेली असेल तर हे सरकार गुजरात साठी बनते काय? असा सवाल उपस्थित होतेय. मंत्रिमंडळाचे विस्तारातील मंत्र्यांना शुभेच्छा मात्र, या सरकारने राज्याच्या जनतेसाठी कार्य करावे ही आमची अपेक्षा आहे, असेही पटोले म्हणाले.


अहमदाबाद-मुंबई फक्त दोन तासांत -  
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल, असा अंदाज आहे. 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील. मुंबई-अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून तर 351 किमी गुजरातमधून आहे.