बुलढाणा : "आम्हाला माहित आहे की शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टात आम्हाला न्याय मिळतो, कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात तिथे आम्ही करु," असं वक्तव्य करुन जळगाव जामोद-शेगावचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत पोलीस आणि प्रशासनाला ठणकावलं. मात्र आमदार कुटे यांना कोर्टाबद्दल इतका आत्मविस्वास कसा आहे हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण कालच (14 एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठराविक राजकीय पक्षाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबद्दल न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच आमदार संजय कुटे यांनी आत्मविश्वासाने केलेल्या वक्तव्याला पुष्टी तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित आता होत आहे. 


महाविकास आघाडी नेत्यांचे न्यायव्यवस्थेवर सवाल
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या याच सूरात सूर मिसळत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अटकेपासून केवळ भाजपच्या नेत्यांना संरक्षण कसं मिळतं असा सवाल त्यांनी विचारला.


पोलिसांकडूनच शेगावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न : आमदार संजय कुटे 
गेल्या काही दिवसात शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत काही घटना घडल्या आहेत. यावरुन शेगाव शहर आणि ग्रामीण पोलीसच कायद्याचा दुरुपयोग करुन शांतताप्रिय शेगाव शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार संजय कुटे यांनी पोलिसांवर केला. याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज (15 एप्रिल) शेगाव शहरात धरणं आंदोलन करण्यात येणार असून येत्या सोमवारपासून (18 एप्रिल) जिल्ह्याभर तहसील कार्यालयात निवेदनं देण्यात येणार असल्याचं संजय कुटे यांनी शेगाव इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यामुळे मात्र पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.


मविआ नेत्यांना कोर्टावर भरवसा नाय काय? सोमय्यांना दिलासा - राऊतांचे सवाल!