Buldhana News Updates : कुटुंब नियोजन समुपदेशन किटमध्ये (family planning counseling kit) रबरी लिंगाचा समावेश केल्यानं नवा वाद उपस्थित होतोय. किटमधल्या सामुग्रीबाबत योग्य प्रशिक्षण दिलेलं नाही अशी तक्रार आशा वर्कर्सकडून करण्यात येत आहे. किटमधील सामुग्रीबद्दल आरोग्य वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना दोन बाळांमधील अंतर सुरक्षित ठेवावं यासाठी आशा, अंगणवाडी स्वयंसेविकांना देण्यात येणार असलेलं किट आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या किटमध्ये असलेल्या वस्तू आक्षेपार्ह असल्याचा काहींचा आरोप आहे तर काही स्वयंसेविकांना यातून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना व्यवस्थित समुपदेशनाची व्यवस्था होऊ शकतं असं वाटतंय.


ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना कुटुंब नियोजनासंबंधी समुपदेशन करण्यासाठी प्रसूती, प्रसूतीनंतर गर्भधारणा, लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वछता याविषयी समुपदेशन तसेच शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एक "कुटुंब नियोजन समुपदेशन किट" देण्यात येणार आहे. पण या किटमधील साहित्य हे आक्षेपार्ह असल्याचं सांगत काहींनी या किटबद्दल वाद उभा केला होता. पण प्रत्यक्षात मात्र ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना यामुळे शिक्षण व समुपदेशन करण्यासाठी मदत होणार असल्याचे काही आशा आणि अंगणवाडी स्वयंसेविकांचं म्हणणं आहे.


या कुटुंब कल्याण समुपदेशन किटमधील काही वस्तू या सार्वजनिक ठिकाणी समुपदेशन करण्यासाठी योग्य नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. परंतु काळाची गरज ओळखून लैंगिक शिक्षण देणे हे क्रमप्राप्त असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मधुसूदन राठोड यांनी एबीपी माझाशी बोलताना फोनवरून सांगितलं आहे.  


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे यांनी म्हटलं आहे की, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला आरोग्य शिक्षण व माहिती या कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. कुटुंब नियोजन समुपदेशन किट आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणानंतर वाटप करण्यात येणार आहे. या किटमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना लोकसंख्या नियंत्रण. लैंगिक आजार, HIV, सिफिलीस या सारख्या आजारांवर शिक्षणामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. शिवाय आपली खाजगी स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना समुपदेशन करण्यात येणार आहे.


लोकसंख्या वाढीला कारणीभूत असलेलं अज्ञान दूर करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लैंगिक शिक्षण देणे आवश्यक असून या किटमधील वस्तू या प्रशिक्षण देऊन आशा आणि अंगणवाडी स्वयंसेविकांना त्याबाबत समुपदेशन करण्यासाठी मदत होणार आहे, असं काहींचं म्हणणं आहे. 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha