व्यंगचित्र प्रकरणावरून जनतेचा रोष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तिघांनी आपले राजीनामे पाठवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कार्टून प्रकरणावरुन शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचं चित्र आहे.
राजीनाम्याचं वृत्त शिवसेनेने फेटाळलं :
दरम्यान शिवसेनेने राजीनाम्यांचं वृत्त फेटाळलं आहे. पक्षाकडे अद्याप कोणाचेही अधिकृत राजीनामे आलेले नाहीत, त्यामुळे शिवसेना खासदार-आमदारांनी राजीनामे दिले असं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे.
‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र
शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन ‘सामना’चा निषेध व्यक्त केला आहे.
व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पेटवत आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
व्यंगचित्राप्रकरणी सुरु असलेल्या राजकारणामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मात्र त्यांचा हा विघ्नसंतोषीपणा खपवून घेतला जाणार नाही. असंही सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सामनाच्या कार्यकारी संपादकांना 'कार्टून' म्हणावसं वाटतं: आशिष शेलार
‘सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच कार्टून म्हणावंस वाटतं.’ अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे कार्टूनवरुन शिवसेना आणि भाजपमध्येही जुंपली आहे.
कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील
‘शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी.’ अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.
सामना’ कार्यालयांवर झालेली दगडफेक ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून झालेल्या अवमाननेविरोधात मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘सामना’च्या व्यंगचित्रामध्ये मराठा मोर्चासह सर्वच समाजातील महिलांचाही अवमान करण्यात आल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला आहे.